कवितेचा ताल हरवला होतं बराच आधी
चाल होती आपल्याच चालण्याची
अर्थाच्या खुणा पुसटच होत्या
संदिग्धताच होती कवितेची ओळख
पुसताना आता आपलीच प्रतिमा
रेष आणि रेष मिसळताना समोरच्या
अव्यक्त अवकाशात
मला माझा आकार जाणवू लागलाय
मला माझा आवाज ऐकू येऊ लागलाय
शहर होतंय वेडसर का मी
हा माझा माझ्याशीच अबोला का?
धावत जातात भविष्याच्या सावल्या
गोंडस आणि भीषण
आठवणीचे व्रण
आणि मी पाहत राहतो त्यांना वेगळं होताना माझ्यातून
आधीचा मी आणि नंतरचा
कुठे आखू रेष
अर्थाच्या जाळ्यात सहज फसला नाद
आवेगात राहून गेला शुद्धीचा निनाद
तरलो त्यातूनही
पोचलो जिथे भाषा फक्त अंतराची
मी आखली नाहीच रेष
तूच एक दिवस सापडून गेलीस मला
माझ्या अविभाज्य एकटेपणाला
केलास तुझ्या अस्तिवाने अधोरेखित
आता नियम आहेत, आहेत शक्याशक्यतेची क्षुल्लक बंधने
पण मला असोशी नाही यापुढे
मी आहे या शहरात, माझाच मी, तुझाच मी
तुझं शहर
पाउस आहे तिथे
आहे निवांत शांत किनारा, माडांच्या सावलीत डोक्यावर निळे मायाळू आकाश
संथ लाटांचे मुग्ध गाणे
पावलांना सुखावणारी वाळू
आणि कवितेचे सारे अर्थ शिम्पलांच्या पोटात उमलणारे
सारे ऋतू बहराच्या उत्सवात
तुझ्या शहरात
Saturday, February 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment