Sunday, February 28, 2010

जळोत माझे शब्द, सरपण बनून एखाद्या शेकोटीत
जिथे चार माणसे हाडे गोठवणाऱ्या थंडीत शोधत असतील
शेवटचा उबारा
बनोत माझे शब्द कच्ची कोरडी भाकरी
भुकेच्या आगीशी खेळ मांडून
असोत माझे शब्द आंधळ्यांचा कंदील
पांगल्याची काठी
अस्तिवाच्या अर्थाची चाल संपू नये

अजून असेन दिसत माझ्या शब्दात मी
तर नाही माझी कविता खरी अजून
मोठी आहे किंमत जिथे
शब्द असतात नियतीचे प्रतिरूप
इतका लागो कस, वेदनांच्या भट्टीत उजळून निघोत शब्द
अक्षरांची लांबी घटो आशयाची खोली वाढताना
माझीच मला पटो ओळख माझे गाणे अंतरात राहो निरंतर
आपल्या आयुष्याचा पडून जावा विसर
माझ्या मस्तीत बनावे मी फकीर

प्रश्न उरू नयेत क्षुद्र त्रिज्यांचे कण कण कुरतडणारे
प्रश्न असोत असे ज्यांच्या उत्तराला असावी
अशक्यातेची परिमाणे
स्वप्नांना असो जहरी दंश
आयुष्याची शांतता वावटळीत फेकणारा
कवितेचा क्षण असो
सार शोषून घेणारा
डोळे मिटोत तेव्हा असावा कृतीचा समाधान
अपूर्णतेच्या शापाताही आनंद असावा अस्सल

दुखे बनोत माझी आयुष्याची कोलमड
व्हावी पडझड सार्याच निवार्याची
अनिकेत असावा चालायचा रस्ता
मान टेकावी तिथे जिथे असेल
अर्थाचा शेवटचा मुक्काम

येवो न येवो बहर डोळे दिपवणारा
नव्या अंकुराची धडपड अखंड रहावी
विजय मिटोत हार करोत राहो डंख
शब्दातली लढाई जिवंत रहावी

No comments:

Post a Comment